नागपूर : नागपूरात दुचाकी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री भिवसनखोरी मार्गावरील वायुसेनानगर प्रवेशद्वाराजवळ घडली. यात रजत मोहरकर (वय 25) व अक्षय डुकरे (वय 23, दोन्ही रा. अमर आश सोसायटी) या दोघा तरुणांचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रजत हा बीएसस्सीला शिकत होता. अक्षयही शिक्षण घेत होता. हे दोघेही शनिवारी रात्री दुचाकीवरून भिवसनखोरीकडून जात होते. दरम्यान, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते थेट वायुसेनानगर प्रवेशद्वाराजवळील नाल्यात कोसळले.
यात जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला. एका नागरिकाला दुचाकीचा दिवा दिसला. तो नाल्याजवळ आला असता त्याला दोन युवक जखमी अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रजत व अक्षयला मृत घोषित केले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.