लातूर : लातूरमध्ये दोन वेगवेगळ्या रेल्वे अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन तासांच्या फरकाने एकच दिवशी हे अपघात झाले आहेत. पहिली घटना लातूर शहरात घडली तर दुसरी घटना रायवाडीजवळ घडली.
मालगाडी आणि पॅसेंजर रेल्वेने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही घटना दोन तासांच्या फरकाने घडल्या आहेत. पहिल्या घटनेत लातूर रेल्वे स्थानक इथून कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या मालगाडीने रायवाडी शिवारात एका तरुणाला जोरात धडक दिली. यामध्ये 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री घडली.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या खिशात आधार कार्ड आढळून आले आहे. त्यावर महादेव मनोहर कापले (25 वर्षे रा. आळंदी, जिल्हा पुणे) असे नमूद करण्यात आले आहे.
तर दुसरी घटना रायवाडीजवळ घडली आहे. नवीन रेणापूर नाका इथल्या उड्डाणपुलाखाली लातूर रोडकडून लातूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघालेल्या रेल्वेने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. या मृताची ओळख पटली असून, मुबारक फारुख शेख (38 वर्षे, रा. आरजखेडा ता. रेणापूर) असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत लातूर इथल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.