पुरंदर तालुक्‍यात दोघांचा मृत्यू

सातशेहून अधिक जनावरे दगावली : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान


पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले


बचाव, मदतीसाठी एनडीआरएफची 5 पथके कार्यरत

पुणे – पुरंदर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झाला असून सातशेहून अधिक जनावरे दगावली आहेत. पुरंदर, भोर, हवेली आणि बारामती तालुक्‍यांत मोठी हानी झाली असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची 5 पथके कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी जोरदार पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरातील सर्व धरणे 100 टक्‍के भरली. 22 वर्षांनंतर प्रथमच एवढ्या लवकर ही धरणे भरली असून, आतापर्यंत सरासरी 180 टक्‍के पावसाची नोंद झाली आहे. परंतु, बुधवारी (दि. 25) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील 15 तालुक्‍यांपैकी 5 तालुक्‍यांना बसला. बारामती तालुक्‍यातील आंबी खुर्द आणि बुद्रुक, माळवाडी यासह 21 गावे, पुरंदर तालुक्‍यातील 24 आणि भोर तालुक्‍यातील 1 गावांना या पावसाचा फटका बसला आहे.

पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरणातून कऱ्हा नदीत 85 हजार क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात आला. त्याचा फटका बारामती शहराला बसला असून, दक्षतेचा उपाय म्हणून बारामती शहरात 38 निवारा शिबिरांची उभारणी केली आहे. रात्री 15 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. परंतु, त्यातील अनेक नागरिक नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले. त्यामुळे सध्या या शिबिरात 2 हजार 500 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून, हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे या नागरिकांना त्याचठिकाणी थांबविण्यात येणार आहे.

275 जवान मदत कार्यात
जिल्ह्यात 5 एनडीआरएफच्या टिम तैनात करण्यात आल्या असून 275 जवान मदत कार्य करत आहेत. त्यापैकी बारामती तालुक्‍यात एनडीआरएफच्या 2 टीम कार्यरत आहेत. तर पुरंदर आणि पुणे शहरासाठी प्रत्येकी 1 आणि अन्य भागासाठी 1 टीम तैनात केली आहे. या आपत्कालिन स्थितीची माहिती निवडणूक आयोगाला कळवून त्यांच्या सूचनांनुसार प्रशासनाच्यावतीने बाधित नागरिकांना मदत देण्यात येणार आहे. आचार संहितेचा कोणताही अडसर मदत व बचाव कार्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

जिल्ह्यात 788 जनावरे दगावली
पुरंदर, हवेली आणि शहर भागात पावसामुळे 788 जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालकांचे मोठे नुसकान झाले आहे. तसेच 14 जनावरे बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक मयत जनावरांची संख्या पुरंदर तालुक्‍यात आहे. 424 लहान जनावरे तर 24 मोठी जनावरे मयत झाली आहेत. साधारण 24 गावांतील ही जनावरे आहेत. हवेली तालुक्‍यात 350 लहान जनावरे तर 4 मोठी जनावरे मृत पावली आहेत. तसेच, पुणे शहरात 14 लहान जनावरे आणि 16 मोठी जनावरे मयत झाली असून, अजून 14 जनावरे बेपत्ता आहेत. पाण्यामुळे मयत झालेल्या जनावरांना बाहेर काढण्यात आले असून, बेपत्ता जनावरांचा शोध सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)