कराड -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जखिणगावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात आणखी तिघे गंभीर जखमी झाले आहेत. श्रीहरी तुकाराम वाघमारे (वय 48, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), बापूसाहेब खंडेराव कांबळे (वय 50, रा. काळेवाडी, पिंपरी, पुणे) अशी अपघातात मृतांची नावे आहेत. तर अश्विनी श्रीहरी वाघमारे (वय 45), रागिनी श्रीहरी वाघमारे (वय 21, रा. भेकराईनगर, हडपसर पुणे), चालक फुलचंद नवनाथ चतुर (वय 39, रा. गंगानगर फुरसुंगी, जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, फुलचंद चतुर हे बुधवारी त्यांचे नातेवाईक श्रीहरी वाघमारे, बापूसाहेब कांबळे, अश्विनी वाघमारे, रागिनी वाघमारे यांना त्यांच्या मारूती कार (क्रमांक एम. एच. 12 एसक्यू 1195) ने पुणेहून बेळगाव येथे औषध आणण्यासाठी निघाले होते. गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ते जखिणवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत पोहोचले असता, मळाईदेवी पतसंस्था समोरील चौकात कारच्या समोरून डाव्या बाजूने आलेल्या एका अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात श्रीहरी वाघमारे व बापूसाहेब कांबळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना
उपचारसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले.
तसेच या भीषण अपघात अश्विनी वाघमारे, रागिनी वाघमारे व चालक फुलचंद चतुर हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच घटनास्थळावरून अज्ञात वाहनधारकाने वाहनासह पोबारा केला. अपघातप्रकरणी फुलचंद चतुर यांनी फिर्याद दिली असून अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्यासह अपघात विभागाचे खलिल इनामदार यांनी अपघात स्थळाला भेट दिली. अपघातप्रकरणी अज्ञात वाहनधारकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्या वाहनाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. बेर्डे करीत आहेत.