9 जण जखमी : पूल बांधणी प्रशिक्षणादरम्यान दुर्घटना
प्रकरणाची गंभीर दखल घेत लष्करातर्फे “कोर्ट ऑफ इन्क्वायरी’
पुणे – लष्करी वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) पूल बांधणी प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत लष्कराचे दोन जवान मृत्युमुखी पडले असून 9 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, लष्करातर्फे “कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ बसविली आहे, अशी माहिती लष्कर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
लष्करासाठी आवश्यक वास्तू, पूल तसेच विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे प्रशिक्षण लष्करी महाविद्यालयातर्फे देण्यात येते. अशाच प्रकारच्या प्रशिक्षणासाठी लष्करी अभियांत्रिकीच्या विविध तुकडीतील जवान महाविद्यालयात दाखल झाले होते. गुरुवारी या लष्करी अधिकारी, जवानांना पूल उभारणीचे प्रशिक्षण दिले जात होते. बेली पूल उभारणीचे काम सुरू असताना पुलाचा आधार देणारा टॉवर अचानक हलल्यामुळे पूल खाली कोसळला. यावेळी पुलाखाली जवळपास 10 ते 12 जवान होते. या पुलाच्या मलब्याखाली अडकलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी तातडीने हालचाली करण्यात आल्या.
लष्करी अधिकाऱ्यांनी पुलाचा राडारोडा बाजूला काढत खाली दबलेल्या जवानांना तातडीने बाहेर काढले. लान्स हवालदार संजीवन पी. के. (वय 29, रा. केरळ), नायक भिवा खंडू वाघमोडे (वय 28, रा. दौंड) या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 9 जवान गंभीर जखमी झाले.
“सीएमई’मध्ये पूल दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू
हवालदार परमजीत सिंग (खडकी), नायक गुरपीत सिंग (खडकी), नायक मंदीप सिंग (सीएमई) यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने खडकी येथील मिलिटरी हॉस्पिटल आणि पुण्यातील कमांड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना या अपघाताबाबत कळविण्यात आले आहे. ही घटना कशी घडली, याबाबत चौकशी समिती (कोर्ट ऑफ इन्कवायरी) स्थापन केली असून, या समितीचा अहवाल आल्यावर याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती लष्कर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.