गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या

गडचिरोली :  नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात हत्याकांड घडवले. जिल्ह्यातील पुरसलगोंदी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह पोलीस पाटलाची नक्षलवाद्यांनी हत्या केली. त्याचबरोबर कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्येही साहित्य व शेडचे नक्षल्यांनी नुकसान केले.

मासु पुंगाटी व ऋषी मेश्राम अशी नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे आहेत. मासु पुंगाटी हे पोलीस पाटील, तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. एटापल्ली तालुक्‍यातील सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षलवाद्यांकडून कायम विरोध होत राहिला आहे. मात्र, शासन व प्रशासनाकडून येथे उत्खननाचे काम सुरू आहे.

या उत्खननाला पुरसलगोंदी येथील पोलीस पाटील मासू पुंगाटी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते ऋषी मेश्राम यांनी समर्थन दर्शविले होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्याची करण्यात आल्याची बाब प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शहीद सप्ताह पाळण्यासाठी नक्षलवाद्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध ठिकाणी पत्रके व बॅनर बांधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहशतीला न जुमानता अनेक गावातील आदिवासी नागरिकांनी एकत्र येत नक्षली बॅनर व पत्रकांची होळी करून “नक्षलवादी मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.