पुणे – पिस्तूल आणी काडतूसांसह दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. दोघेही सिंहगड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ते कोणावरतरी प्राण घातक हल्ला करण्याच्या उद्देशाने आल्याची खबर मिळाली होती.
आदित्य रंजीत चंदेले( 21, रा.आंबेगाव खूर्द) व दत्ता उर्फ राजेश भास्कर इंगळे( 22,रा.आंबेगाव खुर्द)अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणी चार काडतूसे हस्तगत करण्यात आली आहे.
गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाला गस्त घालताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना आरोपी हत्यारे घेऊन जंगली महाराज रस्त्यावर फिरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून दोघांनाही पकडण्यात आले. दोघांची अंगझडती घेतली असता, पॅन्टमध्ये खोचलेले पिस्तूल आणी काडतूसे असा 1 लाख 25 हजाराचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
त्यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदेले विरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात विना परवाना शस्त्र बाळगल्याचा तर राजेश इंगळेवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतीश भालेकर, इम्रान शेख, अमोल पवार, योगेश जगताप आदींच्या पथकाने केली.