नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील बाबिना येथे फील्ड फायरिंग सराव दरम्यान टी 90 रणगाड्यांचे बॅरल फुटल्याने झालेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आणि आणखी एक जवान जखमी झाला. बाबिना फील्ड फायरिंग रेंजमध्ये 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या वार्षिक सरावाच्यावेळी टॅंकची बॅरल फुटुन ही दुर्घटना घडली.
टॅंकवर तीन कर्मचारी तैनात होते. स्फोट झाल्यानंतर या तिन्ही जवानांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. पण त्यांना झालेली इजा गंभीर स्वरूपाची असल्याने त्यात कमांडर आणि तोफखाना चालवणारा जवान असे दोघे जण मरण पावले.
रणगाड्याचा चालकही यात गंभीर जखमी झाला असून मात्र तो आता धोक्याच्या बाहेर आहे असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. लष्कराने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.