इंदापूर शहरात प्रभाग सातमध्ये वास्तवता : घरटी नागरिक आजाराने त्रस्त : नगरपालिकेचे दुर्लक्ष
रेडा- इंदापूर नगरपरिषदेचा राज्यात नाहीतर देशात स्वच्छतेमध्ये स्वच्छ सर्वेक्षणात दरारा निर्माण झाला आहे. आजही यापुढील बक्षीस मिळवण्यासाठी नगरपरिषदेचे कारभारी व प्रशासन स्वच्छ सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टीमला स्वच्छ इंदापूर सुंदर इंदापूर हे दाखवत आहेत. मात्र, याच शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये तब्बल दीडशे ते दोनशे कुटुंबांना ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे शोषखड्डे जागीच डबबले आहेत. त्यामुळे प्रत्येक घरटी नागरिक आजाराने त्रस्त झाला आहे. दीडशे कुटुंबांना नगरपलिका अद्ययावत ड्रेनेज देऊन न्याय देणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
इंदापूर नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक सातमध्ये असणाऱ्या गणेशनगर, दूध डेअरी लाईन, सावतामाळी नगर, मकसूद लाईन परिसरामध्ये दीडशे ते दोनशे कुटुंब ड्रेनेज नसल्यामुळे आपल्या घराच्या दारातच शोष खड्डे घेऊन पाण्याचा निचरा करीत आहेत. नागरिकांच्या वसाहतीकडे नगरपालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले असल्यामुळे ज्या कुटुंबांच्या घरासमोर शोषखड्डे आहेत. ते शोषखड्डे पाण्याने भरले आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि दुर्गंधीमुळे जीव नकोसा झाला आहे. हा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
इंदापूर नगरपालिका सर्व सुविधा पुरवते आहे, असे भासवून आरोग्य कर व इतर कर सक्तीने वसूल करीत आहेत. मात्र, प्रभाग क्रमांक सातमध्ये ड्रेनेज व्यवस्था नाही, ही व्यवस्था नसतानादेखील कर कशासाठी घेता, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
- आम्ही गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने नगर परिषदेमध्ये आम्हास ड्रेनेज द्या. जे शोष खड्डे आमच्या घरासमोर घेतलेले आहेत. दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहोत. असे बऱ्याचदा सांगितले. मात्र याकडे नगरपालिकेचा आरोग्य विभाग लक्ष देण्यास तयार नाही.
– मंदाकिनी भोसले, गृहिणी, इंदापूर. - दहा दिवसांची डेडलाईन
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे आमच्या समवेत कित्येकदा नगरपालिकेच्या प्रशासनाला ड्रेनेज संदर्भात व स्वच्छतेसंदर्भात सांगितले. तरी देखील फरक पडला नाही. त्यामुळे या दहा दिवसांत जर आमच्या भागातील शोषखड्डे साफ केले नाहीत. ड्रेनेज व्यवस्था केली नाही तर महिला मोर्चा काढतीलअसा इशारा मंदाकिनी भोसले,रामा गायकवाड,किसना माने यांनी दिला. - इंदापूर नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षणांमध्ये देशपातळीवर क्रमांक मिळाला आहे. तरी देखील नगरपालिकका प्रशासनाने प्रभाग क्रमांक सातमध्ये स्वच्छतेला कोणतेही प्राधान्य दिलेले नाही. ज्या भागात जुने नाले आहेत. त्या साफ केल्या जात नाहीत. संबंधित भागातील नागरिक लोकवर्गणी जमा करून नाले साफ करतात. शोष खड्डे दीडशे ते दोनशे कुटुंबीयांनी घराच्या समोर घेतले आहेत. त्यांना हक्काचे ड्रेनेज नाही, हे ड्रेनेज द्या म्हणून कित्येकदा नगर परिषदेमध्ये आवाज उठवला. परंतु दिशाभूल केली जात आहे.
– पोपट शिंदे, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस.