श्रीनगर -काश्मीरच्या श्रीनगर शहरात मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये एका जहाल विभाजनवादी नेत्याच्या मुलाचाही समावेश आहे. मारले गेलेले दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते.
श्रीनगरमध्ये एका ठिकाणी काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्री विशेष मोहीम हाती घेतली. दहशतवादी दडलेल्या ठिकाणाला सुरक्षा जवानांनी वेढा घातला. त्यांना पाहून दहशतवाद्यांनी मध्यरात्र उलटल्यानंतर गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने काही काळ चकमक झडली. त्यानंतर सुमारे पाच तास थांबलेली ती चकमक सकाळी पुन्हा सुरू झाली. त्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. त्याआधी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान आणि एक पोलीस असे मिळून दोघे सुरक्षा जवान जखमी झाले.
चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख नंतर पटली. तो दहशतवादी म्हणजे हिज्बुलचा म्होरक्या जुनैद सहराई असल्याचे स्पष्ट झाले. जुनैद हा जहाल विभाजनवादी नेते आणि तहरिक-ए-हुर्रियतचे अध्यक्ष अश्रफ सहराई यांचा मुलगा होता. एखाद्या विभाजनवादी नेत्याच्या मुलाने दहशतवादी संघटनेत सक्रिय होण्याचे ते पहिलेच प्रकरण होते. जुनैद काश्मीर विद्यापीठातून एमबीए झाला होता. दरम्यान, चकमकीत मारला गेलेला दुसरा दहशतवादी परदेशी नागरिक असल्याचा अंदाज आहे. त्याची ओळख तातडीने पटू शकली नाही. जुनैदचा खात्मा हा हिज्बुलसाठी आणखी एक हादरा मानला जात आहे.