कमल हासन हिंदी आणि दक्षिण भारतीय सिनेसृष्टीमध्ये एकाचवेळी सक्रिय असतो. गेल्या अनेक दशकांपासून त्याची ही इमेज कायम आहे. आता “इंडियन 2’च्या निमित्ताने ही इमेज आणखीन पक्की होणार आहे.
दक्षिणेतील नावाजलेले दिग्दर्शक शंकर यांच्या डायरेक्शनखाली तयार होत असलेल्या “इंडियन 2’मध्ये कमल हासनबरोबर काजल अगरवाल आणि रंकुलप्रीत सिंह असणार आहेत. मेकअप आणि स्पेशल इफेक्ट यांचा आपल्या सिनेमात भरपूर वापर करण्यासाठी कमल हासन यांची ख्याती आहे.
“चाची 420′ आणि “इंडियन’ हे दोन्ही सिनेमे त्याची चांगली उदाहरणे आहेत. मेकअप आणि स्पेशल इफेक्टचा वापर करून कमल हासन यांनी “दशावतारम’मध्ये तब्बल 10 पात्रे रंगवली होती.
काजल अगरवालचा या सिनेमातील रोल खूपच आगळावेगळा असणार आहे, असे समजले आहे. “इंडियन’ या पहिल्या भागामध्येही मनिषा कोईराला आणि उर्मिला मातोंडकर अशा दोन नायिका होत्या.
आता दुसऱ्या भागामध्येही दोन नायिका असणार आहेत. पण त्या दोघींबरोबर कमल हासनची केमिस्ट्री कशी असणार आहे, हे बघण्यासाठी आणखीन काही दिवस थांबावे लागणार आहे.