मांजराने घरात आणला “हा’ प्राणी

दोन तोंडांचा साप बघून घरचे गर्भगळीत

फ्लोरिडा (अमेरिका) – अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील पाम हार्बरजवळील एका घरात एका पाळीव मांजराने, त्याला घराबाहेर सापडलेला एका जीव आपल्या तोंडात धरून घरात आणला आणि घरातल्यांनी जेव्हा हा प्राणी पाहिला, तेव्हा सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. त्या मांजराने घरात चक्क दोन तोंडे असलेला दुर्मिळ साप पकडून आणला होता.

फ्लोरिडाची रहिवासी असलेल्या के रॉजर्स या युवतीने आपल्या आईला, मेसेंजरवरुन संदेश पाठवून सांगितले की, नेहमी आपल्यासाठी बाहेरुन वेगवेगळ्या गिफ्ट्‌स आणणाऱ्या आपल्या मांजराने यावेळी चक्क एक जिवंत साप घरात आणला आणि या दुर्मिळ सापाला चक्क दोन तोंडे आहेत. तिने या सापाचे नाव स्नेक डॉस असेही ठेवले. दोन तोंडे असल्याने या सापाला आपल्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येत नसल्याचे निरीक्षण के रॉजर्सने नोंदवले आहे.

के रॉजर्सने हा संदेश समाज माध्यमांतही पाठवला आणि त्यासोबत त्या दुतोंडी सापाचे फोटोग्राफ्सही तिने शेअर केले. ही पोस्ट व्हायरल होताच माध्यमांचेही त्याकडे लक्ष गेले आणि फ्लोरिडाच्या वन्य जीव विभागाने या दुतोंडी सापाची ओळखही पटवली असून, हा साप सदर्न ब्लॅक रेसर असल्याचे सांगून ती छायाचित्रेही फेसबुकवर शेअर केली आहेत.

दोन तोंडे असलेले साप सहसा फार काळ जिवंत रहात नाहीत कारण त्यांचे दोन मेंदू शरीराला एकाच वेळेस दोन वेगवेगळे आदेश देतात. त्यामुळे हालचालींपासून भक्ष्यावर हल्ला करण्यापर्यंत या सापाच्या दोन मेंदूंतून एकमत कधीच होत नाही. त्यामुले निसर्गत:च हे साप लवकरात लवकर मरुन जातात. अपवादानेच असे साप मानवी वस्तीत आढळतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.