स्थायी समितीत चर्चा न करताच प्रस्तावास मान्यता
पुणे – बदलत्या जीवनशैलीमुळे शहरात कोठेही आणि कोणालाही हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी स्थिती उद्भवल्यास सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, पीएमपीचालक आणि वाहकांसह महापालिका शाळेतील माध्यमिक विभागांच्या मुलांना अशा रुग्णांवर प्राथमिक जीवनदायी तंत्र (सीपीआर) करण्याचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली 2 कोटी 69 लाख रुपयांचा खर्च करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
विशेषबाब म्हणजे, शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातलेले असताना, तसेच पुरामुळे उद्भवलेल्या आरोग्य तसेच स्वच्छतेच्या स्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाकडून पैसे नसल्याचे कारण पुढे केले जात असताना या प्रशिक्षणासाठी करण्यात येणारी उधळपट्टी चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणासाठी महापालिका जी किट खरेदी करणार आहे त्या कंपनीकडून पुढील वर्षभर हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महापालिकेच्या 2019-20 च्या अंदाजपत्रकात पालिका शाळांमधील मुलांना सीपीआरचे प्रशिक्षण देण्यासाठी 2 कोटी 80 लाखांची तरतूद केली. मात्र, शालेय मुलांना हे प्रशिक्षण देऊन फायदा होणार नसल्याचे लक्षात येताच, प्रशासनाकडून या प्रशिक्षणाचे किट खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया राबवीत हे प्रशिक्षण सार्वजनिक तसेच वर्दळीच्या ठिकाणी असलेले सुरक्षारक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालिका सुरक्षारक्षक, पीएमपी तसेच एसटीचे चालक-वाहक यांना देण्याच्या नावाखाली 788 सीपीआर किट खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच, हे प्रशिक्षण दृकश्राव्य स्वरूपात देण्यासाठी 80 टॅबलेटही खरेदी केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हकांरे यांनी स्पष्ट केले.
खर्चाची उधळपट्टी सुरूच
दोन वर्षांपूर्वीही अशाचप्रकारे शहरातील प्रत्येक प्रभागात आरोग्य तपासणी शिबिर घेण्याच्या नावाखाली अंदाजपत्रकात 20 कोटींची तरतूद नगरसेवकांकडून केली होती. मात्र, त्यावेळी प्रशासनाकडून अशा शिबिराची आवश्यकता नसल्याचे सांगत तसेच हा खर्च उधळपट्टी ठरणार असल्याचे निश्चित करत ही शिबिरे रद्द केली होती. मात्र, आता शहरातील सार्वजनिक आरोग्याची स्थिती गंभीर बनलेली असताना प्रशासनाकडून पुन्हा हार्ट ऍटॅकची भीती दाखवत 2 कोटी 69 लाख रुपयांच्या उधळपट्टीचा घाट घातला आहे.