पोलीस कर्मचाऱ्यासह एक नागरिक जखमी दोन्ही गटांच्या 27 जणांविरुद्ध गुन्हा
टाकळीभान – गेल्या काही दिवसांपासुन खदखदत असलेल्या टोळीयुध्दाचा सोमवारी सायंकाळी भडका उडाला. दोन गट आमनेसामने आल्याने तुफान धुमष्चक्री झाली. पोलीस कर्मचारी ए.एस. पवार जखमी झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरिक्षक मसुद खान यांनी घटनास्थळाकडे धाव घेवुन जादा पोलीस कुमक बोलवून परिस्थिती नियंत्रणात आली. या मारामारीमुळे गावात तणावाचे वातावरण पसरले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने टाकळीभानला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले.
टाकळीभान येथे गेल्या वर्षभरापासुन दोन गटात धुसफुस सुरु आहे. दोन्ही गट बाह्य शक्तींना पाचारण करीत असल्याने एक दिवस या टोळी युध्दाचा भडका होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जुन्या वादातुन दोन्ही गट समोरासमोर भिडले. सकाळी दोन्ही गटात हाणामारी झाली होती. त्यातील काही तरुणांवर गुन्हाही दाखल झाला. मात्र सायंकाळी पुन्हा हा वाद उफाळून आला.सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोन्ही गट हातात लाठ्या, काठ्या, गज, तलवार घेवुन जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमने सामने आले. तुफान हाणामारी सुरु झाली. या परिसरातील कांबळे यांच्या कापड दुकानात काही तरुण घुसले. दुकानातील सामान अस्ताव्यस्त करीत दुकान मालक कांबळे यांनाही मारहाण केली. दुकानासमोरील दुचाकी फोडली.
या हाणामारीत एकाने तलवार काढल्याने पो.हे.कॉं.पवार यांनी तलवार मारणाऱ्याला धरण्याचा प्रयत्न केल्याने पवार यांच्या हाताला चांगलीच दुखापत झाली. या दगडफेकीत रस्त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या सतिष कोकणे या दुचाकीस्वाराल दगड लागल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली. या हाणामारीत बाजारपेठेत प्रचंड दहशत निर्माण झाल्याने व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली.
तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. मसुद खान यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणली.अंधाराचा फायदा घेवुन दोन्ही गटाचे कार्यकर्ते पसार झाले होते. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जादा कुमक घेवुन टाकळीभानला दाखल झाले. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरुप आले होते. गुंडगिरी व दहशत निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे मदने व खान यावेळी म्हणाले. मदने व खान टाकळीभान दुरक्षेत्रात रात्री उशीरापर्यंत ठाण मांडुन आरोपींचा शोध घेत होते.
याबाबत आविनाश विठ्ठल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आर्मअक्ट व ऍट्रॉसिटी कायद्यानुसार कान्हा रणनवरे, लाला मैड, विठ्ठल जाधव, मनोज पवार, पंकज जाधव, अक्षय कोकणे, सूरज गंलाडे, योगेश डुकरे, सोमनाथ चितळे, अहमद इनामदार, अमोल चितळे, गणेश नागले, हर्षल बोडखे, गौतम कापसे, दादासाहेब सांवत, प्रकाश रणनवरे व इतर 10 ते 12 जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच पो.हे.कॉं.अरविंद पवार फिर्यादीवरून राजू जाधव, प्रशांत नागले, रवींद्र बोडखे, सनी जाधव, हर्षल बोडखे, विठ्ठल जाधव, गोविंद रणनवरे, रवींद्र रणनवरे, अमोल रणपिसे, दिगंबर साठे, गौतम कापसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.