बारामतीत धनगर समाजात दोन गट?

एकाने अजित पवारांना, तर दुसऱ्याने गोपीचंद पडळकरांना दिला पाठिंबा

– प्रमोद ठोंबरे

बारामती – बारामती विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार शुक्रवारी (दि. 4) अर्ज भरणार आहेत. तर महायुतीचे भाजपचे उमेदवारी गोपीचंद पडळकर यांची अधिकृतरित्या बुधवारी (दि. 2) रात्री उशीरा जाहीर करण्यात आली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बारामतीत भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

पडळकर हे धनगर समाजाचे नेतृत्व करतात. या मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ दोन नंबरवर धनगर समाज आहे. मात्र, बुधवारी सकाळी धनगर समाज बांधवांमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने अजित पवार तर दुसऱ्या गटाने गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे बारामतीत दोन्ही गटांत राजकारण तापले आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना कडवे आव्हान निर्माण करण्यासाठी भाजप उमेदवाराच्या शोधात होता. त्यातच आटपाडी (जि. सांगली) येथील पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या गोटात पुन्हा सहभागी झाले. ते धनगर समाजाचे नेतृत्त्व करीत असून त्यांना मानणारा मोठा गट आहे. पवार यांना तगडे आव्हान उभे करण्यासाठीच भाजपने स्थानिक उमेदवारांना डावलत “आयात’ पडळकर यांच्या नावावर रात्री उशीरा शिक्‍कामोर्तब केले.

दरम्यान, महायुतीचा उमेदवार बुधवारी सकाळपर्यंत अधिकृतरित्या जाहीर झाला नसतानाही उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी बैठक झाल्याने समाजात दोन गट पडल्याचे समोर आले आहे. त्यातील पहिल्या गटाची सूर्यनगरीतील अहिल्यादेवी होळकर हॉस्टेल येथे बैठक झाली. त्यात पवारांना पाठिंबा देण्याचे ठरले. तर भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत दुसऱ्या गटाने भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीचे राजकारण आता कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

यंदा काट्याची टक्‍कर…
महायुतीत बारामती विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना मात देण्यासाठी भाजपने खेळी करीत दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचन कुल यांना उमेदवारी देत बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे अस्तित्व निर्माण केले. त्यातच महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यावेळी बारामती शहरात तळ ठोकून होते. त्यामुळे बारामतीत भाजपची ताकद बऱ्यापैकी वाढली. याच ताकदीचा फायदा उठवत अजित पवारांना “टक्‍कर’ देण्यासाठी भाजप सज्ज झाला असला आहे. त्यामुळे यंदा काट्याची टक्‍कर होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

पहिला गट म्हणतो की….
शरद पवार व अजित पवार यांनी धनगर समाजातील अनेकांना विविध पदांवर संधी दिली. विकासासाठी केलेले कार्य विचारात घेऊन धनगर समाज आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहील, असे सूर्यनगरी येथे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, बापूराव सोलनकर, मदन देवकाते, राजेंद्र बोरकर, दत्तात्रय येळे, शिवाजीराव टेंगले, अविनाश भिसे, विजय गावडे, संपत टकले, रमेश गोफणे, संजय देवकाते, कुंदन देवकाते, प्रकाश देवकाते, गुलाबराव देवकाते, आबा टकले यांच्यासह इतर धनगरबांधव उपस्थित होते.

दुसरा गट म्हणतो की…
गेल्या अनेक वर्षांत कॉंग्रेस व राष्ट्रवादीने एकाही धनगर समाजाच्या व्यक्‍तीला आमदार, खासदार म्हणून संधी दिली नाही. भाजप सरकारने महादेव जानकर, राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. विकास महात्मे यांना खासदार केले. मूठभर लोकांनी धनगर समाज म्हणून पाठिंबा जाहीर करू नये. धनगर समाजाचा खरा विकास भाजपच करीत असल्याने बारामतीचे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी धनगर समाज खंबीरपणे उभा राहिल, असे भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, गोविंद देवकाते, नीलेश धालपे, गुलाबराव गावडे, भारत देवकाते, संदीप चोपडे, ऍड. अमोल सातकर, अभिजीत देवकाते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.