वीज कोसळून दोन मुलींचा मृत्यू

नसरापूर येथे कातकरी वस्तीवर घटना : एक जखमी

कापूरहोळ  -भोर तालुक्‍यातील नसरापूर (चेलाडी फाटा) येथे अंगावर वीज कोसळून कातकरी समाजातील दोन मुलींचा मृत्यू झाला, तर एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वीज कोसळून दोन मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. सीमा अरुण हिलम (वय 11), अनिता सिकंदर मोरे (वय 9, दोघीही रा. नसरापूर), असे मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. ही घटना रविवारी (दि.2) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेलाडी फाटा येथे आदिवासी समाजातील मासेमारी करणाऱ्या कुटुंबांची लोकवस्ती येथे आहे. येथील एकाच वर्गात शिकत असलेल्या तीन बालमैत्रिणी घराशेजारील डोंगर पायथ्यालगत असलेल्या एका मोठ्या दगडाजवळ खेळत असताना अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी या असा आवाज दिला. मात्र, अवघ्या काही अंतरावर असतानाच मोठा आवाज होऊन वीज कोसळली. यात दोन मुली गंभीर भाजून दगडापासून लांब फेकल्या गेल्या. यात सीमा आणि अनिताचा मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मुलींना नसरापूर येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वी दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेतील चांदणी प्रकाश जाधव (वय 9) हिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुटुंबांना आधार दिला.

राजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे, उपनिरीक्षक राहुल साबळे महसूल विभागाचे श्रीनिवास कंद्देपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील यांनी मुलींच्या कुटुंबांना तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.