गॅलेक्‍सी ग्रुपच्या दोन संस्थापक संचालकांना अटक

कंपनीविरोधीतील तब्बल 26 गुन्ह्यांतील मुख्य आरोपी


जादा व्याजाच्या आमिषाने करोडो रुपयांची फसवणूक


सन 1999पासून फरार होते दोन्ही आरोपी

पुणे – गॅलेक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन संस्थापक अध्यक्षांना अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या राज्यात 102 शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या. त्याद्वारे 7 कोटी 8 लाख 49 हजार रुपयांचा अपहार करुन आरोपी 1999 मध्ये फरार झाले होते. गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) व उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथक यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

सतीशचंद्र भगवतीप्रसाद मिश्रा (65), रामकृष्ण प्रेमचंद दुबे (58, दोघेही रा.संतकबीरनगर, खलिलाबाद, उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

गॅलेक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीजने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात 26 गुन्हे दाखल झाले होते. याचा तपास महाराष्ट्र सीआयडी करत आहे. या कंपनीविरुद्ध महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांतही गुन्हे दाखल आहेत. यातील मुख्य आरोपी असलेले कंपनीचे संचालक मागील 20 वर्षांपासून फरार आहेत. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्ह्यातील फरारी आरोपींची माहिती घेतली. यानंतर उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना जेरबंद केले आहे. चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी लखनौ येथे जेरबंद झाले. यातील इतर आरोपी प्रमोदकुमार गंगा पांडे, अमोदकुमार पांडे, घनश्‍याम कालीप्रसाद पांडे, मैफतुल्लाखान अब्दुलमजीद खान, रहेफिरदौस अफताब अहमद सिद्दीकी, सतेंद्र वशिष्ठ त्रिपाठी या सर्वांचा उत्तरप्रदेशात शोध घेतला जात आहे.

प्रकरण काय?
गॅलेक्‍सी ग्रुप ऑफ कंपनी अंतर्गत आरोपींनी पाच वेगवेगळ्या कंपन्यांची कानपूर येथे नोंद केली होती. राज्यात या कंपनीच्या 120 शाखा होत्या. कंपनीने अधिक व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यावधी स्वरुपाच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. यानंतर कोणतीही रक्कम परत न करता 1999 मध्ये 7 कोटी 8 लाख 49 हजार 266 रुपयांचा अपहार करुन कंपनी बंद केली. यानंतर आरोपी फरार झाले. त्यामुळे वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी येथे गुन्हे दाखल झाले. याप्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले असून सीआयडीने अनेकदा उत्तरप्रदेशात आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके पाठवली होती. दरम्यान, गुन्ह्यात आतापर्यंत 4 कोटी 86 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना नागपूर येथे न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. या प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे) जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे) पल्लवी बर्गे, अपर पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, पोलीस उप अधीक्षक विलास भोसले, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक यशवंत निकम व पोलीस हवालदार कृष्णकांत देसाई, दत्तात्रय भापकर यांनी कामगिरी बजावली

Leave A Reply

Your email address will not be published.