कराड (प्रतिनिधी) – कराड पंचायत समितीतील दोन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी (दि. 11) रात्री आलेल्या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्काळीपणामुळे हे कर्मचारी बाधित झाल्याचा आरोप होत आहे. तालुक्यात शनिवारी रात्री एकूण 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची एकूण संख्या चारशेच्या वर गेली आहे.
कराड पंचायत समितीतील 50 वर्षांचा पुरुष व 56 वर्षांची महिला कर्मचारी, मलकापूर चार, ओगलेवाडीतील तीन, मसूरनजीक कवठे, विठ्ठलवाडी (तुळसण), तारुख व मसूर येथील प्रत्येकी एक करोनाबाधित झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
198 गावांचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीत करोनाचा शिरकाव झाला आहे. पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांसमवेत गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांचा राबता येथे असतो; परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी पंचायत समितीत विशेष काळजी घेतली नसल्याचा आरोप होत आहे. पंचायत समितीत येणाऱ्यांची तपासणी केली जात नाही, त्यांच्या नोंदी केल्या जात नाहीत, सॅनिटायझर व प्रवेशद्वारावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीजवळ अनेकदा साबण उपलब्ध नसतो, अशा तक्रारी कर्मचारी व नागरिक करत आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या सूचनांना केराची टोपली
करोना रोखण्यासाठी पंचायत समितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात, पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंबंधी सभापती प्रणव ताटे व उपसभापती रमेश देशमुख यांनी गटविकास अधिकारऱ्यांना वारंवार सूचना दिल्या; पण या सूचनांना केराची टोपली दाखवली गेल्याने कर्मचाऱ्यांवर ही आफत ओढवली आहे, असा आरोप होत आहे.