दोन डझन कारभारी अन एक दिवसाचा ‘कारभार’ !

महादेव वाघमारे
दाखले, परवान्यासाठी आठवड्यात फक्‍त एक दिवस
पुरेशा अधिकारी, कर्मचाऱ्यांअभावी विकास खोळंबला
वर्ष सरले तरी आकृतीबंध कागदावरच

खासदार, आमदारांचा कानाडोळा…

वडगाव नगरपंचायतीच्या स्थापनेला एक वर्ष झाले आहे. स्थानिक खासदार व आमदारांनी पुढाकार घेवून पूर्ण वेळ अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नगरपंचायत करून काय फायदा झाला, त्यापेक्षा ग्रामपंचायतच चांगली होती, असे नागरिक जाहीररित्या बोलत आहेत. त्वरित पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त करून वडगाव शहराचा विकास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वडगाव मावळ – नगरपंचायत अस्तित्वात येऊन वर्षे झाले, तरी नगरपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती झाली नाही. नगरपंचायतीचा विकास खोळंबला आहे. तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषदेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त कार्यभार दिला आहे. आठवड्यातून एक ते दोन दिवसच त्यांचे दर्शन होते. विविध दाखले व परवानग्या मिळविण्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत. त्वरित पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहेत.

मावळ तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगाव-कातवी ग्रामपंचायतीचे 3 फेब्रुवारी 2018 रोजी नगरपंचायतीत रुपांतर झाले. तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीत विकास होवून नागरीवस्तींना सोयीसुविधा मिळणार अशी वाटत होते, मात्र सर्वांचाच अपेक्षाभंग झाल्याचे नागरिक बोलत आहेत. 26 जुलै 2018 रोजी नगराध्यक्ष मयूर ढोरे व 17 नगरसेवकांची निवड झाल्यावर विषय समित्या निवड झाली. प्रभागांतर्गत नागरीवस्तीत विकास कामांसाठी निधीच उपलब्ध होत नाही. 1290 हेक्‍टर चौरस मीटर क्षेत्रात नगरपंचायतीची हद्द असून, सुमारे 35 हजार लोकवस्ती आहे. वार्षिक साडेचार कोटींची उलाढाल होत असून, पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी नसल्याने शहराचा विकासच रखडला आहे.

नगरपंचायतीसाठी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांची नियुक्‍ती झाली आहे. आता या नगरपंचायतीसाठी कार्यालयीन अधीक्षकपदी लोणावळा नगरपरिषदेचे विजय शेवाळे नियुक्‍त असून, ते वडगाव नगरपंचायतीच्या कार्यालयात आठवड्यातून एकच दिवस हजेरी लावतात. लेखापालपदी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ज्ञानेश्‍वर मोहिते नियुक्‍त आहेत, ते वडगाव नगरपंचायतीच्या कार्यालयात आठवड्यातून केवळ एकच दिवस उपस्थित राहतात. नगररचना विभागात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे शरद पाटील नियुक्‍त असून, ते वडगाव नगरपंचायतीच्या कार्यालयात आठवड्यातून फक्‍त दोनच दिवस येतात. बांधकाम विभागात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अनिल वाणी कार्यरत असून, ते आठवड्यातून केवळ एकाच दिवस हजेरी लावतात.

उर्वरित विभागाला अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त केले नाहीत. यात आरोग्य विभागात 18, तर पाणीपुरवठा विभागात 26 कर्मचारी नियुक्‍त आहेत. प्रथम नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, नगरसेवक दशरथ केंगले, दिनेश ढोरे, शारदा ढोरे, राहुल ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, प्रवीण चव्हाण, प्रमिला बाफना, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, रांजेंद्र कुडे, सायली म्हाळसकर सर्वच पदाधिकारी तरुण अनुभवी नेतृत्वक्षम आहेत. त्यांना शहराच्या विकासाची कामे करताना पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होऊन वर्ष झाले आहे. अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त नसल्याने शहराचा विकास थांबला आहे. नागरिकांना विविध दाखले व परवानगी घेण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. नगरपंचायतीच्या इमारतीचेही गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम रखडले आहे. नगरपंचायत एक भ्रमनिरास ठरत असून, त्वरित पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त करणे आवश्‍यक आहे.

– अतुल वायकर, जागरूक नागरिक, वडगाव.

वडगाव नगरपंचायतीमध्ये तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. तेही आठवड्यातून एक ते दोन दिवसच कार्यालयात उपस्थित राहतात. वडगाव शहराचा झपाट्याने विकास करण्यासाठी सर्वच पदाधिकारी सक्षम असून, वर्ष होत असतानाही पूर्णवेळ अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त केले नाही. आकृतीबंध मंजूर असून, नगरविकास विभागाने प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. मंजुरी मिळण्याची प्रतीक्षेत दिसतो. तरी त्वरित पूर्णवेळ अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करीत आहोत.

– मयूर ढोरे, नगराध्यक्ष, वडगाव-कातवी नगरपंचायत, वडगाव.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.