नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील सफदरजंग येथील दोन निवासी डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. यापैकी एक जण हा करोना रुग्णांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांच्या पथकातील आहे. ते कर्तव्य बजावित असतानाच्या काळातच ते आजारी पडले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांची करोनाची चाचणी घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बायोकेमिस्ट्री विभागातील तृतीय वर्षाच्या पदव्युत्तर विद्यार्थिनी असलेल्या महिला निवासी डॉक्टरलाही करोना झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. ती अलीकडेच परदेश दौऱ्यावरून मायदेश परतली आहे.
या दोघांमध्येही करोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी घेतली असता ते पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या त्यांच्यावर आता सफदरजंग रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणत्याही संपर्कात आलेल्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला नसल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.