मुंबईत पहिल्याच पावसात नाल्यात पडून दोघांचा मृत्यू

मुंबई – मुंबईत झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात नाल्यात पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. महापालिकेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासगी कंत्राटदाराच्या दोन कामगारांचा मॅनहोलमध्ये सफाई काम करताना पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. रामकृष्ण आणि सुधीर दास अशी मृतांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर प्रतीक्षा करीत होते त्या पावसाने शनिवारी जोरदार बॅटिंग केली. किंग्ज सर्कल, टिळकनगर, अंधेरी, दहिसर सब वे, मिलन सब वे, सायन रोड नंबर, दादर टी टी आणि अन्य काही सखल भागांत पावसाचे पाणी काही प्रमाणात साचले.
साचलेल्या पाण्यामधूनच रस्ते वाहतूक सुरू होती. तर सायन येथे पावसाचे पाणी साचल्याने या मार्गाने धावणाऱ्या बसगाड्यांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली. पहिल्याच पावसात मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.





