हरियाणातील कारखान्याला आग लागून दोघांचा मृत्यू

हरियाणा – हरियाणा राज्यातील बहादूरगड येथे कूलर बनवण्याच्या एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या आगीवर ताबा मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला 20 तासांहून अधिक वेळ लागला. या दुर्घटनेत अन्य काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी क्रिएटिव्ह हायटेक नावाच्या कारखान्यात आग लागली होती. मृतांची ओळख पटली असून दिपक ठाकूर (पाटणा, बिहार) आणि शोएब अंसारी (मेरठ, उ.प्र.) अशी मृतांची नावे आहेत. श्वास गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विषारी धुरामुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळेस मृत दोघेही फॅक्‍टरीत काम करत होते.

दरम्यान, आज (दि.22) सकाळी आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमनच्या अधिकाऱ्यांना फॅक्‍टरीच्या आतमध्ये जाण्यास यश आले. त्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)