शिरूर शहरात हे दोन दिवस कडक लॉकडाऊन

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांची होणार तपासणी

शिरूर(पुणे)-माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शिरूर शहरात 16 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत शहरातील सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. संशयित नागरिकांची करोना रॅपिड टेस्ट करण्यात येणार असल्याचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल व शिरुर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. यासाठी शिरूरचे आमदार अशोक पवार, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.

 

शिरूर शहरातील दवाखाने, मेडिकल सुरु राहणार असून सकाळच्या वेळेस दूध विक्री सुरू राहणार आहे. किराणा, भाजीपाला ही सर्व दुकाने 16 व 17 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. शहरातील 300 विविध क्षेत्रातील कर्मचारी यांच्या 145 टीम संपूर्ण शिरूर शहरातील नागरिकांची ऑक्‍सिजन, तापाची तपासणी करणार आहेत. यातील संशयितांची लगेच करोना रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. शहरातील मुंबई बाजार येथील शाळा, लाटेआळी येथील शाळा, शिरूर ग्रामीण रुग्णालय, शिरूर नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत या पाच ठिकाणी फ्लू क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहेत. या क्‍लिनिक मधून शहरातील नामांकित डॉक्‍टर यांच्याकडून तपासणी करून सर्दी, ताप, खोकला यावर औषध गोळ्या देण्यात येणार आहे. तसेच करोना संशयित रुग्णांची याच ठिकाणी करोना टेस्ट करण्यात येणार असून यासाठी शहरातील खासगी लॅब यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा वैशाली वाखारे, स्वच्छता आरोग्य सभापती विठ्ठल पवार यांनी केले आहे.

 

  • सर्वे कामी 300 शिक्षक व नगरपालिका कर्मचारी काम करत आहेत. नगरपालिकेने केलेल्या आव्हानास आतापर्यंत शहरातील 97 युवकांनी करोना स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. आणखी 300 स्वयंसेवक यांची आवश्‍यकता असल्याने नागरिकांनी, तरुण, तरुणी, महिला, स्वयंसेवी संघटना यांनी यात सहभागी व्हावे.
    -प्रकाश धारिवाल, सभागृह नेते शिरूर नगरपरिषद

Leave A Reply

Your email address will not be published.