सातारा – अनंत चतुर्दशीला आणि आदल्या दिवशी सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणुका होत असल्याने दि 11 व 12 रोजी वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हे बदल बुधवारी सकाळी सहा ते शुक्रवार सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहतील.
राजपथ-कमानी हौद-देवी चौक-मारवाडी चौक ते मोती चौक या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कमानी हौद ते शेटे चौक, कर्मवीर पथ, शेटे चौक, शनिवार चौकमार्गे मोती चौक, मोती चौक-राधिका टॉकीजकडून कृत्रिम विसर्जन तळे, स्टेट बॅंकेची प्रतापगंज पेठ शाखा, जिल्हा मध्यवर्ती बॅंक राजवाडा शाखा ते मोती तळे हा संपूर्ण रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. समर्थ मंदिर ते चांदणी चौक आणि बोगदा ते शाहू चौक हे हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहेत. सज्जनगड व कास पठाराकडे जाणारी जड वाहने बोगदा, शेंद्रे मार्गाकडून जातील. बोगद्याकडून सातारा शहरात येणारी वाहतूक चांदणी चौकाऐवजी अदालत वाडा, शाहू चौका मार्गे एसटी स्टॅंडच्या दिशेने वळविण्यात आली आहे.
मोळाचा ओढा येथून साताऱ्यात येणारी वाहने करंजे, भूविकास बॅंकमार्गे पुढे जातील. कोटेश्वर मंदिर, राधिका रोडमार्गे एसटी स्टॅंडकडे जाणारी वाहने कोटेश्वर मंदिर, शाहूपुरी, मोळाचा ओढा, महानुभव मठ, करंजेकडून एसटी स्टॅंडकडे जातील. शेटे चौक, शनिवार चौक, जुना मोटार स्टॅंड, मोती चौक या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने स्थानिक रहिवाशांनी आपली वाहने पर्यायी मार्गाने न्यावीत, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि व्ही. ए. शेलार यांनी केले आहे. तालीम संघ मैदान, गुरुवार परज, गांधी मैदान व कोटेश्वर मैदान येथे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.