पिंपरी, (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटरच्या आज (दि.28) होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तीनही दिग्गज नेते एकत्र येत आहेत.
चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत. यानिमित्ताने अनेक दिवसांनंतर हे तीनही नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने कोविडच्या काळातही त्यांच्या वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील हे तिघे जण राजकीय हेवीवेट नेते समजले जातात. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत, पहाटे घेतलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. तत्पूर्वी चंद्रकात पाटलांचा चंपा असा उल्लेख करत अजितदादांनी राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधले होते. तर करोना प्रादुर्भावाच्या काळात राज्य सरकारच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी चालविलेल्या विरोधी मोहिमेमुळे भाजपवर मोठी टीका झाली होती.
महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे नव्याने 400 बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यानिमित्ताने हे तीनही राजकीय दिग्गज एकत्र येत आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या काळातही राज्याला राजकीय फटकेबाजी ऐकायला मिळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे पिंपरी-चिंचवडकरांसह सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.