कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दोन कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी या बाबत घोषणा केलीय.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी पन्नास लाख रुपये देत असून, पन्नास लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करणार आहोत. यातील २५ लाख रुपये ग्रामीण व नागरी आरोग्य, तर २५ लाख रुपये सीपीआरमधील वैद्यकीय सेवेसाठी खर्च करण्यात यावेत. संपूर्ण जगभरात कोरण्याचा प्रादुर्भाव झाला असून मोठे संकट ओढवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देशभरात लाॅकडाऊन पुकारला असून, प्रत्येकाने आपापल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोणीही घराबाहेर पडू नये. या संकटावर मात करण्यासाठी सीपीआर, महानगरपालिका, जिल्हा पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन चांगल्याप्रकारे काम करत आहे. विविध स्तरांतून मदत जाहीर केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवस्थान समितीतर्फे शासनाकडे मदत सुपूर्द करत आहोत अस देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटलं आहे.
पत्रकावर कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई व शिवाजी साळवी यांची नावे आहेत.