नाल्यावरील बांधकामावरून दोन नगरसेवकांत खडाजंगी

नगर – केडगाव येथील नाल्यावरील अनधिकृत बांधकाम होत असल्याचा आरोप करीत हे बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अमोल येवले यांनी केली. त्यावर नगरसेवक मनोज कोतकर यांनी अतिक्रमणाची पाहणी करून त्यावर कारवाई करण्यात यावी असे सुनावले. त्यावरून येवले व कोतकर त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

महापालिकेत सोमवारी (दि.9) स्थायी सभा झाली. यावेळी स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, गणेश कवडे, दिपाली बारस्कर, अविनाश घुले, शोभा बोरकर, मनोज कोतकर, योगीराज गाडे, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, सुनिल पवार, लेखा परिक्षक चंद्रकांत खरात, नगरसचिव एस.बी.तडवी आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर-पुणे मार्गावरील केडगावातील नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याचे येवले यांनी स्पष्ट करून यावर मनपाने कारवाई करावी अशी मागणी केली. या मुद्द्यावर कोतकर यांनी अतिक्रमण हटविण्याच्या विषयावर मनपाने शहानिशा करून अतिक्रमणे हटावावे असे सांगितले. त्यावरून दोघात चांगलीच खडाजंगी उडाली. सभेत अनेक विषय मंजूर करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला बुरुडगाव कचरा डेपोतील खतनिर्मित प्रकल्प पुन्हा कार्यन्वित होणार असून या प्रकल्पासाठी 13.76 कोटींची निविदा प्राप्त झालेल्या निविदीला स्थायीने मंजूरी दिली आहे.

सावेडी डेपोतील प्रकल्प बंद करण्यासाठी बुरुडगाव येथे 100 मे.टन क्षमतेचा खतनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी मनपाकडे दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. मायो वेसेल्स अँड मशिन्स प्रा, लि. या संस्थेची निविदा प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केली आहे. प्रकल्पासाठी मशिनरी पुरविणे व बसविण्यासाठी 3 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर आगामी 5 वर्षासाठी प्रकल्प चालविण्यासाठी संस्थेने 590 रुपये प्रति. मे टन दर प्रस्तावित केला आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी 13 कोटी 76 लाख 75 हजार रुपये खर्च होणार आहे. सोमवारी स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.

गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा
शहराचे विविध प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी स्थायीची सभा होत असून हे माहित असतांनाही अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिले आहेत. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीसा द्या, त्यांना सभेचे गांभिर्य नसल्याचे दिसत आहे. असे सभा सुरु होताच स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख यांनी म्हटले.

मनपाच्या खतामध्ये काचा
शहरात 140 मे.टन कचरा संकलन होतो. त्यापैकी 100 मे. टन कचऱ्यापासून खत तयार करण्यात येणार आहे. या कचऱ्याच्या 60 ते 70 टक्के खत निर्मित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी नगरसेवक वाकळे म्हणाले की, यापूर्वी काही शेतकऱ्यांनी खत नेली, शेतातही टाकली. मात्र, या खतात काचा आढळून आल्या असल्याचे शेतकऱ्यामधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकल्पामध्ये असा प्रकार घडणार नाही, याची दक्षात घ्या असे ते म्हणाले.

सभापतींकडून ठेकेदारांची पाठराखण
पावसाळ्यात मनपाकडून शहरातील ठिकठिकणी खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकामास ठेकेदारास जबाबदार असल्याचे नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी म्हटले. यावर सभापती मुद्दसर शेख म्हणाले, मनपाकडून या कामाची निविदा उशीरा निघाली आहे. तसेच गणेशोत्सव व मोहरम मिरवणूक मार्गावर तातडीने खड्डे बुजविण्याचे काम सुरु करावे लागले. यामुळे ठेकेदाराला दोष देणे चुकीचे असल्याचे सांगत एक प्रकारे सभापतीकडून ठेकेदारांची पाठराखनच करण्यात आली.

अधिकाऱ्यांचे बसणे मुश्‍कील करू : वाकळे
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक बैठका झाल्या. अनेक विषय घेण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने हे विषय तडीस जात नाही. त्यामुळे आता असे चालणार नाही. वेळेत कामे न झाल्यास अधिकाऱ्यांचे बसने मुश्‍कील करू असा इशारा नगरसेवक कुमार वाकळे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)