आयसोलेशन सेंटरला विरोध केल्याने दोन नगरसेवक, माजी महापौर ताब्यात

पिंपरी – मनपा प्रशासनाने आयसोलेशनसाठी ताब्यात घेतलेल्या इमारतीत करोना बाधित परिसरातील नागरिकांना ठेवण्यासाठी विरोध करणाऱ्या माजी महापौर आर. एस. कुमार, विद्यमान नगरसेवक अमित गावडे आणि राजू मिसाळ यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर नोटीस बजावून त्यांना सोडून दिले.

शहराच्या काना-कोपऱ्यात “करोना’ने शिरकाव केला आहे. काही मोजकेच परिसर अद्यापही “करोना’पासून दूर आहेत. त्यापैकीच एक प्राधिकरणाचा परिसर आहे. अद्याप येथून एकही “करोनाबाधित’ रुग्ण आढळलेला नाही. याच परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिका “करोना’चे शहरातील सर्वांत मोठे केंद्र असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना क्‍वॉरंटाइन करत आहे. यामुळे स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी विरोध सुरु केला आहे.

आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि. 22) 14 नागरिकांना तिथे क्वारंटाईन केले आहे. येथे आणखी 500 नागरिकांना तिथे क्वारंटाईन करण्याचे नियोजन आहे. परंतु, आनंदनगरमधील नागरिकांना पीसीसीओईमध्ये क्वारंटाईन करण्यास माजी महापौर आर. एस. कुमार, नगरसेवक शरद दत्ताराम मिसाळ उर्फ राजू मिसाळ, नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्यासह अनूप मोरे, राजेंद्र बाबर, योगेश बाळकृष्ण जाधव, निलेश अनिल जांभळे यांनी तीव्र विरोध केल्याने त्यांना रावेत चौकीच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.

म्हणून घाबरताहेत नागरिक
आनंदनगरमधील जे 14 नागरिक क्‍वॉरंटाइन केले होते, त्यातील तिघांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे त्याचा निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांना धोका संभावू शकतो, असे स्थानिक नगरसेवकांचे म्हणणे आहे. “करोना’ने रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने आनंदनगर झोपडपट्टीचा परिसर सील केला होता. तरीही मोठ्या संख्येने आनंदनगरमधील नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले होते. त्यानंतर या परिसरात मोठ्या संख्येने “करोना’चे रुग्ण आढळले. असाच प्रकार निगडी प्राधिकरणात घडल्यास “करोना’चा प्रादुर्भाव वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.