पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या पुणे विभागातील 134 वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकनाची दुसरी फेरी पूर्ण केली आहे. दरम्यान, उच्च शिक्षण विभाग व विद्यापीठ यांच्याकडून वारंवार स्मरणपत्र देऊन दोन महाविद्यालयांनी अद्याप “नॅक’ मूल्यांकनाची एकही फेरी पूर्ण केली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. अनुदानित व विनाअनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या महाविद्यालयांना “नॅक’ मूल्यांकन करून घेण्याची सक्ती केली आहे. पुणे विभागात एकूण 168 अनुदानित महाविद्यालये आहेत. यातील 166 महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील 81, अहमदनगर 39, नाशिक 46 महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकन करून घेतले आहे. पुण्यातील 63, अहमदनगर 33, नाशिक 38 महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकनाची दुसरी फेरीही पूर्ण केली आहे. एकूण 71 महाविद्यालयांनी मूल्यांकनाची तिसरी फेरीही पूर्ण केली आहे.
पुण्यातील येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालय, अहमदनगरमधील खर्डा येथील श्री संत गजानन महाराज महाविद्यालय या दोन अनुदानित महाविद्यालयांनी आतापर्यंत एकदाही “नॅक’ मूल्यांकन केले नाही. या दोन्ही महाविद्यालयांना गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा “नॅक’ मूल्यांकन करून घेण्याबाबत पत्रे पाठविली आहेत. या पत्रांना महाविद्यालयांकडून काहीच दाद देण्यात आली नाही. या महाविद्यालयांना बऱ्याचदा स्मरणपत्रेही पाठविली आहेत. तरीही त्यांनी “नॅक’ मूल्यांकन करून घेतले नाही, ही बाब गंभीर आहे अशी माहिती पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय व विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली.
महाविद्यालयांनी कारवाईची वेळ आणू देऊ नये
प्राचार्यांची उदासीनता, संस्थांमधील अंतर्गत वाद, न्यायालयीन प्रकरणे, प्राचार्य व सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे, महाविद्यालयातील सुविधांचा अभाव अशा कारणाने काही महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकनाकडे पाठ फिरविली आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी स्पष्ट केले. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठाशी असलेली संलग्नता रद्द करण्याची कारवाई करण्याची वेळ आणू देऊ नये, असा इशाराही दिला आहे.