रायपूर -छत्तिसगढ सशस्त्र दलाच्या (सीएएफ) एका जवानाने सहकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर गोळीबार केला. त्यामध्ये दोन जवान मृत्युमुखी पडले, तर एक जवान जखमी झाला.
छत्तिसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात सीएएफची छावणी आहे. त्या छावणीत शुक्रवारी रात्री कुठल्याशा कारणावरून काही जवानांमध्ये वाद झाला. त्यावेळी संतप्त झालेल्या घनश्याम कुमेटी या जवानाने त्याच्या एके-47 रायफलमधून सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यामध्ये बिंदेश्वर साहनी आणि रामेश्वर साहू हे जवान मृत्युमुखी पडले. तर लच्छूराम प्रेमी हा जवान जखमी झाला.
गोळीबार करणाऱ्या कुमेटीला इतर जवानांनी पकडले. त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे. जवानांमधील वादाचे कारण तातडीने समजू शकले नाही.