नवी दिल्ली – सहारनपूरहून दिल्लीला प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 2DS पॅसेंजर ट्रेनमध्ये शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात इंजिनसह दोन डबे जळून खाक झाले आहेत. ट्रेनचा ब्रेक जाम झाल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. साकौती येथे पोहोचल्यानंतर चालकाला आग लागल्याचे समजले. त्याचवेळी दौराला स्थानकात ट्रेन पोहोचल्यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन दौराला स्टेशनवर पोहोचली तेव्हा तिच्या इंजिनच्या खालच्या बाजूला आग लागली. यानंतर, ट्रेनमधील प्रवाशांना धूर आणि ठिणग्या निघताना दिसल्या आणि ते आरडा-ओरड करत ट्रेनमधून बाहेर पडत प्लॅटफॉर्मवर धावले. यानंतर त्यांनी ट्रेनमधील इतर प्रवाशांना आणि चालकालाही सावध केले. ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच यावेळी अनेक लोकांनी मागच्या डब्यात बसलेल्या प्रवाशांनाही घटनेची माहिती देत सावध केले.
आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि बोगीतील आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग इतकी भीषण होती की दोन तासांच्या अथक परिश्रमानंतरही अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणता आली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.