क्वारंटाईनचे शिक्के असणाऱ्या दोन डाॅक्टरांचे दवाखाने मिरजमध्ये सील

सांगली (प्रतिनिधी) : परदेश दौरा करून आल्यानंतर होम क्वारंटाईन राहण्याऐवजी मिरजेतील बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ असणाऱ्या दोन डाॅक्टरांनी आपला दवाखाना सुरू ठेवल्याप्रकरणी त्यांचे दवाखाने महापालिकेच्यावतीने सील करण्यात आले.

महापालिका उपायुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित दवाखान्यास टाळे ठोकले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. दोन्ही डॉक्टरांच्या हातावर शिक्का मारुन त्यांना सक्तीने होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

न्यूझीलंडला सहकुटुंब जाऊन दि.१५ मार्च रोजी मिरजेत परतलेल्या स्त्रीरोग व बालरोगतज्ज्ञ या दोन डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू ठेवले होते. दोघांनाही विमानतळांवर दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून प्रॅक्टिस करत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका उपायुक्त स्मृती पाटील व आरोग्य विभागाच्या पथकाने दोन्ही डाॅक्टरांच्या हाॅस्पिटलला टाळे ठोकले.तसेच संबंधित डॉक्टरांच्या हातावर शिक्का मारून त्यांना सक्तीने होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

तर एका डॉक्टरांच्या बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या बालरुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले. संबंधित डाॅक्टरानी परदेशातून आल्यानंतर प्रशासनाला माहिती देऊन रुग्णावर उपचार थांबविणे आवश्यक होते. मात्र, दवाखाना व उपचार सुरू ठेवून त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णाचेही आरोग्य धोक्यात आणल्याने संबंधितांच्या रुग्णालयास टाळे ठोकल्याचे महापालिका आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे यांनी सांगितले .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.