कराडमध्ये तळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

कराड – येथील ईदगाह मैदानातील तळ्यात बुडून शनिवार पेठेतील सुरज भरत भोसले (वय १३) व शुभम धनाजी चौगुले (वय ११, दोघे रा. जोशी वस्ती, उर्दू हायस्कूलमागे, कराड) या दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनास्थळावारून मिळालेल्या माहितीनुसार, येथील जोशी वस्तीतील सुरज, शुभम व त्यांचा एक मित्र असे तिघेजण ईदगाह मैदान परिसरातील तळ्याभोवती शनिवारी सायंकाळी खेळत होते. त्या परिसरात पालिकेने वृक्षारोपणासाठी खड्डे काढले आहेत.

सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे प्रत्येक खड्डा व तळ्यात भरपूर पाणी आहे. त्याच तळ्यात ही दोन लहान मुले बुडाली. ती बुडताना तळ्याशेजारी खेळणारा तिसरा मुलगा तेथून पळत घरी गेला.

जोशी वस्तीत त्याने या दोघांबाबतची घटना सांगितली. तातडीने वस्तीतील नागरिक तळ्याच्या दिशेने धावले. दोघांना तळ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री उशिरा मुलांचे मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.