बेल्हे (वार्ताहर) – शिरोलीतर्फे आळे (ता. जुन्नर) येथे शनिवार (दि.30) दोन करोना रुग्ण पॉझिटिव्ह तर पारूंडे येथे आणखी एक बाधित आढळल्याने तालुक्यात रुग्णसंख्या 22 वर पोहोचली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर एक रुग्ण बरा झाला आहे. सध्या तालुक्यात करोनाचे 20 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
डिंगोरे येथे (दि.20 एप्रिलला करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. उपचारानंतर हा रुग्ण बरा झाला. त्यानंतर दोन महिने तालुका करोनामुक्त होता. मात्र, मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक नागरिकांनी जुन्नरला आपापल्या गावी धाव घेतली. त्यानंतर धोलवड येथे करोनाचा दुसरा रुग्ण (दि. 23) आढळून आला. सात दिवसांत तालुक्यात 21 रुग्ण आढळले. यातील बहुतेक रुग्ण मुंबई येथून आलेले आहेत.
दरम्यान, औरंगपूर येथील रुग्णाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 28) मृत्यू झाला आहे. उर्वरित 20 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गावनिहाय रुग्णांची संख्या- डिंगोरे – 1 रुग्ण (बरा झाला आहे), सावरगांव -5, खिलारवाडी- 1, मांजरवाडी -2, पारूंडे – 3, आंबेगव्हाण – 2,धोलवड – 3, धालेवाडीतर्फे मिन्हेर – 1, विठ्ठलवाडी वडज – 1, शिरोलीतर्फे आळे 2, औरंगपूर – 1 (मृत्युमुखी) एकूण- 22.