सिमीचे सदस्य असणारे दोन भाऊ एटीएसच्या जाळ्यात

मुंबई : स्टुडंटस्‌ इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे दोन सदस्य महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) जाळ्यात आले आहेत. इजाज अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख अशी त्या सिमी सदस्यांची नावे आहेत. ते एकमेकांचे भाऊ आहेत.

ंमुंबईत 2006 मध्ये रेल्वेत बॉम्बस्फोट झाले. त्या स्फोटांत 188 जण मृत्युमुखी पडले. त्या स्फोट प्रकरणात मुख्य आरोपी एहतेशाम सिद्दीकी याला याआधीच दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. सिद्दीकीचे साथीदार असल्याच्या संशयावरून इजाज आणि इलियास तपास आणि सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होते. इजाज याला गुरूवारी मध्यप्रदेशात अटक करण्यात आली.

ती कारवाई मध्यप्रदेश एटीएसने केली. त्याला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून महाराष्ट्र एटीएसने तातडीने हालचाली करून इलियास याला दिल्लीत पकडले. आता त्या दोन्ही भावांना पुढील तपासासाठी मुंबईत आणले जाईल. त्यानंतर 16 डिसेंबरला त्यांना मुंबईतील न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्या चौकशीतून सिमीच्या कारवायांबाबत महत्वाची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.