देहूगाव -देहूगाव येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ इंद्रायणी नदीत बुडून दोन भावांचा पाण्यात मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 26) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
साहिल विजय गौड (वय 10) आणि अखिल (वय 8 दोघे रा. सध्या देहूगाव, मूळ रा. ग्राम देवऱ्या देहात, गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहेत.
प्रत्यक्षदर्शनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव येथील परंडवाल चौकामध्ये सुरू असलेल्या एका बांधकाम साइटवर विजय हरिलाल गौड हे मजुरी करतात. विजय गौड यांची दोन मुले साहिल व अखिल हे शुक्रवारी सकाळी इंद्रायणी नदीपात्रामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले.
नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. त्याचवेळी तिथे असणारा त्यांचा मित्र शेखर याने दोघांना वाचण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला जवळच असलेल्या देहूतील समीर मनेर याने वाचविले.
मात्र साहिल आणि अखिल हे दोघेजण पाण्यात बुडाले.सुदुंबरे येथील एनडीआरएफ पथकाचे 25 जवान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहा जणांचे पथक, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पथकाचे 6 जवान, तर वन्यजीव रक्षक मावळ पथकाचे दहा कर्मचाऱ्यांनी साहिल आणि अखिल या दोघांचा शोध घेतला. अथक प्रयत्नानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
शवविच्छेदनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. हवेली तहसीलदार गीता गायकवाड, तलाठी अतुल गीते यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद दळवी तपास करीत आहेत.