पोटची दोन्ही मुले गमाविली; कुटूंबावर दुःखाचा डोंगर
पिंपरी -डेंग्यूसदृश्य आजाराने थेरगावातील एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा आज मृत्यू झाला. तर, महिनाभरापूर्वीच चिमुकल्याच्या भावाचाही डेंग्यूसदृश्य आजारानेच मृत्यू झाला होता. महिना उलटण्याच्या आत एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. दरम्यान पोटच्या दोन्ही मुलांना गमाविल्याने आईसह संपूर्ण कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
उजेर हमीद मणियार (वय 4, रा. पडवळनगर, थेरगाव) या बालकाचा शुक्रवारी (दि. 13) पहाटे चार वाजता मृत्यू झाला. तर, त्याचा नऊ महिन्यांचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा 16 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. महिनाभराच्या आतच दोन्ही मुले साथीच्या आजारामुळे गमावल्याने मणियार कुटुंबिय सैरभैर झाले आहे.
उजेर याला उपचारासाठी पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुण्यात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान उजेरचा मृत्यू झाला. डेंग्यूसदृश्य आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. तर, महिनाभरापूर्वीच उजेर याच्या भावाचा मृत्यू झाला होता. दोघांचेही रिपोर्ट डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याचे आले आहेत.
नागरिकांचा संताप
थेरगाव परिसरात गेल्या आठ महिन्यांपूर्वी जुनी जलवाहिनी काढून नवीन टाकण्यात आली. हे काम करताना जलवाहिनीचे जुने कनेक्शन मात्र तसेच ठेवले गेले. त्यामुळे स्वच्छ पाण्याचे डबके साचून डेंग्यू डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होत आहे. पर्यायाने, परिसरातील नागरिकांना डेंग्यूची लागण होत आहे. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आईची अवस्था बिकट
पोटच्या दोन्ही मुलांना गमविल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तर, मणियार कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.