पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सहायक आयुक्त या पदावर कार्यरत असलेले मंगेश चितळे आणि स्मिता झगडे यांना उपायुक्त करावे, अशी शिफारस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शासनाच्या नगरविकास खात्याकडे केली आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या उपायुक्तपदावर या दोघांची नियुक्ती केली जाणार असून शासन मान्यता मिळताच या दोघांनाही पदोन्नती दिली जाणार आहे. दोघांनी सहायक आयुक्त म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेत आयुक्तांनी ही शिफारस केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या आकृतीबंधाला 17 जानेवारी 2020 रोजी मान्यता मिळाली आहे. नव्या आकृतीबंधानुसार महापालिकेमध्ये 11 सहायक आयुक्तांसह 7 उपायुक्तांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या महापालिकेत केवळ सहायक आयुक्त कार्यरत आहेत. सात उपायुक्तांपैकी 4 शासनाचे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी असणार आहेत. तर तीन महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नतीने संधी मिळणार आहे. सध्या सुभाष इंगळे हे शासननियुक्त एकमेव अधिकारी कार्यरत आहेत. मंगेश चितळे व स्मिता झगडे हे शासनाकडून सहायक आयुक्तपदावर नियुक्त अधिकारी आहेत.
या दोन्ही अधिकाऱ्यांना शासनाकडून प्रतिनियुक्तीवरील जागेवर नियुक्ती देण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून करोनाच्या काळात या दोन्ही अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यातच चितळे हे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे विश्वासू अधिकारी समजले जात असल्याने चितळे यांची उपायुक्तपदावरील नियुक्ती जवळजवळ निश्चित मानली जात आहे. चितळे यांच्यासह झगडे नियुक्तीला अनेक नगरसेवकांनीही पाठिंबा दर्शविल्यामुळे दोघांच्याही नियुक्तीला नगरविकास विभागाकडून मान्यता मिळण्याची शक्यता अधिक आहे.