युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक; पुण्यातील कोंढवा परिसरात घेतले ताब्यात

स्वास्तिक चौकातील बसस्थानकासमोरील घटना : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर: स्वास्तिक चौकातील बसस्थानकासमोर बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यूप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली. शेख फैजान अब्दुल रौफ ऊर्फ फैजान बाबासाहब जहागीरदार (वय 26), शेख अराफत अब्दुल रौफ उर्फ अराफत बाबासाहब जहागीरदार (वय 24, दोघे रा. जुना बाजार, खिस्त गल्ली, नगर) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, दि. 29 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता चे सुमारास पुणे बस स्थानक समोर किरण उध्दव जगताप (वय- 20 वर्षे, रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन, नगर) यांना किरकोळ कारणावरुन अनोळखी मुलांनी कोणत्या तरी हत्याराने डोक्‍यावर मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत जखमीचे वडील उध्दव यशवंत जगताप (वय 43, रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन, नगर) यांनी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जखमी किरण जगताप याचेवर आनंदऋषी हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना मंगळवारी निधन झाले होते.

गुन्हा घडल्यापासून आरोपी हे पुण्यातील कोंढवा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे स्टेशन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. औताडे यांनी गुन्ह्यातील आरोपी फैजान जहागीरदार हा त्याचे साथीदारांसह कोंढवा, पुणे परिसरात लपून बसलेला आहे. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगळ, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब काळे, मोहन गाजरे, विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक बाळासाहेब भोपळे यांनी कोंढवा, पुणे येथे जावून मिळालेल्या माहीतीनूसार कोंढवा परिसरात आरोपींचा शोध घेवून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.