कराड – मुनावळे ता. कराड येथील दरे गावच्या शिवारात गाडीतील टेपचा आवाज वाढविल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी गुरूवारी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सोमवार दि. 20 पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. (दत्तात्रय माणिक कोळेकर वय 27 रा. मुनावळे) व सचिन मोहन घाडगे (वय 23 रा. कालेटेक) असे अटक झालेल्यांची नावे आहेत.
गाडीतील टेपचा आवाज मोठा का केला. या कारणावरुन चिडून जावून लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना मुनावळे येथे घडली होती. याबाबतची फिर्याद योगेश कमलाकर यादव (वय 27, रा. नारायणवाडी, ता. कराड) यांनी तालुका पोलीस स्टेशनला दिली. या मारहाण प्रकरणी कराड तालुका पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुनावळे, ता. कराड गावच्या हद्दीतील दरे नावाच्या शिवारात योगेश यादव हा भाऊ रोहित याचे मित्रांसोबत जेवण करत होते. यावेळी दत्ता कोळेकर रा. मुनावळे व त्याच्या सोबत आलेला सचिन घाडगे रा. कालेटेक व इतर चार अनोखळी इसमांनी संगनमताने योगेश, रोहित व त्याचे मित्र यांना लाकडी दांडके व लोखंडी रॉडच्या साह्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांचेही नुकसान करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
मारहाण प्रकरणी दत्ता कोळेकर व सचिन घाडगे यांचेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचे संशयित फरारी होते. कराड तालुका पोलिसांनी सापळा रचून दत्तात्रय कोळेकर व सचिन घाडगे याला गुरूवारी अटक केली. त्यातील दत्तात्रय कोळेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता सोमवार दि. 20 पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अधिक तपास पोलीस निरीक्षक वंजारी करीत आहेत.