मुंबई – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाईद्वारे 133.68 कोटीच्या रुपयांच्या खोट्या बिलांद्वारे शासनाची 19.93 कोटी रुपयांची महसूल हानी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे.
मे. देवराम ट्रेडर्स व मे. अपोलो एंटरप्राईज या व्यापाऱ्यांच्या उल्हासनगर व नालासोपारा येथील ठिकाणी राज्य शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी शुक्रवारी विशेष कारवाई करण्यात आली होती. तपासणीदरम्यान या व्यापाऱ्यांनी बनावट वीजबिल, आधार आणि पॅनकार्ड द्वारे नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले.
वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरू असलेल्या धडक मोहीमेअंतर्गत संबंधित कंपन्यांचे मालक अनिल देवराम जाधव व संतोष अशोक शिंदे यांना अटक करण्यात आली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक केले आहे. सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत असल्याने अटक कारवायांच्या वाढत्या संख्येद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.