सातारा : वाळूच्या अवैध वाहतूकीवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या सातारा तहसीलदार व नांदगावचा कोतवाल यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दोघांना बोरगाव पोलिसांनी अटक केली.
नवनाथ जगदाळे, सचिन देशमुख (दोघे रा. नांदगाव, ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2019 मध्ये सातारा तहसीलदार आशा होळकर व नांदगावचा कोतवाल हे मिळालेल्या माहितीनुसार अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी गेले होते. यावेळी तहसीलदारांनी दोन जेसीबी जप्त करून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
यावेळी संशयित व तहसीलदार यांच्यात वादावादी झाली. दरम्यान संशयितांनी त्यांना धक्काबुक्की केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तेव्हापासून संशयित फरार होते. दि. 6 रोजी संशयित बोरगाव नांदगाव परिसरात येणार असल्याची माहिती बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे.