ठाणे – करोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरल्य जाणा-या रेमडेसिवीर इंजेक्शनाचा काळाबाजार करणा-या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून चार इंजेक्शन जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 80 हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. रेमडेसिवीरच्या एका इंजेक्शनची किंमत 5 हजार 400 रुपये असताना त्याचा काळाबाजार केल्या जात असल्याचे उघड झाले आहे.
राल्फ टोनी रॉड्रिक्स व सोनू डॅनियल दर्शी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मीरा रोड येथील एका करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची या इंजेक्शनसाठी धावपळ सुरू होती. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना हे इंजेक्शन 30 हजार रुपयांना मिळेल असे सांगितले. परंतु चार इंजेक्शन हवी असल्याने तडजोड करून ती 20 हजार रुपयांना एक असे निश्चित करण्यात आले.
याबाबत संबंधिताने मीरा रोड पोलिसांकडे तक्रार दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. तसेच इंजेक्शनही पोलिसांनी जप्त केली आहेत.