कोल्हापूर – खोटी बिले देऊन अथवा घेऊन शासनाची कोट्यवधी रुपयांच्या महसूलाच्या नुकसानी प्रकरणी शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत दोघांना अटक करण्यात आली आहे. शासनाची 140 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यकर सहआयुक्त सुनीत थोरात यांनी दिली आहे.
मे. बालाजी एन्टरप्राइजेस, मे. तिरुपती मेटल, मे. तिरुपती ट्रेडर्स, मे. दुर्गा ट्रेडिंग, मे. गणपती ट्रेडर्स, मे. कृष्णा एन्टरप्राइजेस या कंपन्यांवर अन्वेषण शाखेमार्फत छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान करदाते मे. तिरुपती मेटलचे मालक राम दिलीप बैरानी आणि मे. बालाजी एन्टरप्राइजेसचे मालक सुरेश दिलीप बैरानी या दोन भावांनी आपल्या नातेवाईक व कामगार यांच्या नावावर मे. तिरुपती ट्रेडर्स, मे. दुर्गा ट्रेडिंग,आणि मे. कृष्णा एन्टरप्राइजेस या बोगस कंपन्या सुरु केल्या आहेत, असे निदर्शनास आले.
या दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या प्रत्यक्ष खरेदीशिवाय गुजरात राज्यातील भावनगर व अहमदाबाद येथील बनावट कंपन्यांकडून 140 कोटी रुपयांची खोटी बिले घेऊन 25.35 कोटी रूपयांची वजावट प्राप्त केली आहे. दोन्ही करदात्यांनी जीएसटी कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून शासनाची मोठ्या प्रमाणात महसूल हानी केल्याचे उघडकीस आले आहे.
अन्वेषण कार्यालयामार्फत केलेल्या कार्यवाही दरम्यान सर्व व्यवसायांमध्ये राम दिलीप बैरानी व सुरेश दिलीप बैरानी हे दोघेजण महसूल हानीमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले असून या दोघांना दिनांक 24 जून रोजी करण्यात आलेल्या धडक कार्यवाही दरम्यान अटक करण्यात आली आहे. या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने दि. 8 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्यकर सहआयुक्त सुनीता एस. थोरात यांनी दिला आहे.