पुण्यातील अडीच लाख विद्यार्थी थेट दहावी, बारावीत

नववी व अकरावीचे सरसकट विद्यार्थी उत्तीर्णचा लाभ

* पुढच्या वर्षी दहावी-बारावी परीक्षार्थ्यांची संख्या वाढणार
* नववी, अकरावीचे राज्यातील 31 लाख विद्यार्थी पुढच्या वर्गात

पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने पहिली ते आठवी इयत्तांबरोबरच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पुण्यातील इयत्ता नववीच्या 1 लाख 46 हजार 229, तर अकरावीच्या 1 लाख 16 हजार 273 असे एकूण 2 लाख 62 हजार 502 विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यानंतर इयत्ता नववीमध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास त्याची पुन्हा परीक्षा घेता येते. परंतु, अनेक शाळा दहावीचा निकाल चांगला लागावा, यासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करीत असल्याचे चित्र आहे. त्यात इयत्ता अकरावीला सुद्धा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी सर्वच विद्यार्थी थेट दहावी व बारावीत प्रवेश होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या वर्षी दहावी-बारावी परीक्षार्थी संख्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्षभर शाळा बंद होत्या. त्यातच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. यंदा मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. मागील आठवड्यापर्यंत इयत्ता अकरावीचे प्रवेश सुरू होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा फारसा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. तरी या विद्यार्थ्यांना आता थेट पुढच्या वर्गात जाण्याची मुभा मिळाली आहे. मात्र, दहावी-बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने त्याचा पाया म्हणून नववी व अकरावीतील काही विषयाची संकल्पना समजण्यासाठी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्‍यक असल्याचे काही प्राचार्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 2019-20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीच्या 17 लाख 97 हजार 655, तर इयत्ता अकरावीच्या 13 लाख 22 हजार 386 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. 2020-2021 या शैक्षणिक वर्षातही साधारणपणे एवढ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 31 लाख 20 हजार विद्यार्थी थेट दहावी व बारावीच्या वर्गात जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.