संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय विज्ञानिक गटामध्ये भारतातील दोन कृषीतज्ञांचा सहभाग असणार आहे. स्थायी अन्न प्रणालीसाठी वैज्ञानिक गटाची स्थापना संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनियो ग्युटेरेज यांनी केली आहे. या गटामध्ये ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. रतन लाल आणि आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या डॉ. उमा लेले यांचा या गटामध्ये समवेश करण्यात आला आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
प्रा. लाल हे भारतीय अमेरिकन वंशाचे मृदा संशोधक आहेत. अन्न उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक स्रोत आणि हवामान बदलाच्या आधारे मृदा केंद्रीत दृष्टीकोन विकसित करण्याबद्दल त्यांना 2020 चा जागतिक अन्न पुरस्कारही जाहीर झाला आहे.
लाल हे ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधील मृदा विज्ञान या विषयाचे प्रतिष्ठित प्राध्यापक असून कार्बन मॅनेजमेंट अँड सिक्वेस्टेशन सेंटरचे ते संस्थापक संचालक आहेत. गेल्या 50 वर्षात जगभरातील चार खंडांमध्ये त्यांनी केलेल्या मृदाविषयक सुधारणांचा 50 कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे आणि शेकडो दशलक्ष नैसर्गिक भूमीही वाचली आहे.
उमा लेले यांनी कृषी अर्थशास्त्रात पी.एच.डी. मिळवली असून जुलै 2018 मध्ये “इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स’च्या अध्यक्षा म्हणून त्या निवडल्या गेल्या होत्या. त्यांना जागतिक बॅंक, विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधन, ऑपरेशन्स, धोरण विश्लेषण आणि मूल्यमापन करण्याचा पाच दशकांचा अनुभव आहे.