सीसीटिव्ही फुटेजच्या सहाय्याने पटली आरोपीची ओळख
पिंपरी – दुचाकीस्वाराला कट मारल्याने त्याने मोटार चालकाला मारहाण करून मोटार पळवून नेली. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. ही घटना पुनावळे येथे घडली.
ऋतिक पाटील गायकवाड (वय 20, रा. दत्त मंदिराच्या मागे, जांबे ता. मुळशी, पुण) मोहन शांताराम जाधव (वय 20 रा. तुकाई मंदिराशेजारी, शिंदेवस्ती, नेरेगांव ता. मुळशी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तम्मा पांडुरंग बुरंगे (वय 23, रा. ऊरळी देवाची, ता. हवेली, पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 3) रात्री पुनावळे येथे रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी तम्मा यांच्या मोटारीला एकाने आडवी दुचाकी लावली. त्यानंतर त्यांना मारहाण करून मोटार पळवून नेली.
याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरवात केली. सुरवातीला सीसीटिव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटली. त्यानंतर पोलीस नाईक आतिक शेख यांना बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार इंदीरा कॉलेज जवळील शनि मंदिर या आरोपी मोटारीसह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपी गायकवाड आणि जाधव यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोटार चोरल्याची कबुली दिली. मात्र फिर्यादी तम्मा यांनी मोटारीचा कट मारल्याने आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलीस आयुक्त आर. के. पदमनाभन, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीकांत मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, उपनिरीक्षक अनिरुद्ध गिझे, एम. डी. वरुडे, कर्मचारी वायबसे, बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हणमंत कुंभार, सुभाष गुरुव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडु, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.