संगमनेर ( प्रतिनिधी) – गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर खुर्द परिसरात रायतेवाडी फाट्यावर दोघांना बुधवारी (दि. 21) रोजी रात्री साडे नऊ च्या सुमारास अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचा पांढऱ्या धातूचा पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, एक प्लॅटिना कंपनीची विना नंबरची दुचाकी, आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पृथ्वीराज उर्फ देवा आबासाहेब देशमुख (वय 22) आणि किरण विजय दळवी (वय 24) ( दोघे रा. शिरसगाव ता. नेवासा)असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर खुर्द शिवारात रायतेवाडी फाट्यावर दोघा आरोपींकडे 25000 रुपये किंमतीचे दोन्ही बाजूला प्लास्टिकची मूठ बसवलेली, पांढऱ्या धातूचा गावठी बनावटीची पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
तसेच 50 हजार किमतीची विना नंबरची बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लॅटिना गाडी, 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. ए. माळी हे करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे तालुक्यातून शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.