न्यूयॉर्क : जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ट्विटर कंपनीचा नवा सीईओ कुणीही व्यक्ती नसून हा चक्क एक कुत्रा आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी स्वतः ट्विटरच्या नव्या सीईओचा फोटो पोस्ट करत ट्वीट केले आहे. मस्क यांनी त्यांचा पाळीव कुत्रा फ्लोकी ट्विटरचा नवा सीईओ असल्याचे ट्वीट केले आहे.
मस्क यांनी त्यांचा लाडका कुत्रा फ्लोकीचा CEO च्या खूर्चीवर बसलेला फोटो शेअर करत ट्वीट केले आहे. एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ट्विटरचा नवीन सीईओ फार चांगला आहे. इतकंच नाही तर मस्क यांनी फ्लोकी इतर माणसांपेक्षा चांगला असल्याचे म्हटले आहे.
And has 🔥🔥 style pic.twitter.com/9rcEtu9w1Z
— Elon Musk (@elonmusk) February 15, 2023
मस्क यांनी दुसरा फोटो ट्वीट करत ट्विटरच्या नव्या सीईओच्या स्टाईलचे कौतुक केले आहे. फ्लोकीची स्टाईल भारी असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेक युजर्सनी या फोटोला लाईक आणि शेअर तसेच रिट्विटही केलं आहे. युजर्स कमेंट करत फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एलॉन मस्क ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते नेहमी असे गमतीशीर ट्वीट करत असतात. त्यामुळे नेटकरी मस्क यांच्या खोडकर शैलीत ट्वीटची मजा घेताना दिसत आहेत. ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मस्क यांनी कंपनीचे कायदेशीर सल्लागार प्रमुख विजया गड्डे आणि CFO नेल सेगल यांनाही कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता.