नवी दिल्ली – केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूचनेवरून ट्विटरने अनेक जणांची ट्विटर अकाउंट आज रोखली. जवळपास 100 जणांची ट्विटर अकाउंट आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित 150 ट्विट रोखण्यात आले आहेत.
30 जानेवारीला करण्यात आलेल्या पोस्टमध्ये चिथावणीखोर, प्रक्षोभक आणि बनावट माहिती पसरवणारे ट्विट होती. त्याच्या आधारे ही अकाउंट अणि ट्विट रोखण्यात आली आहेत.
रोखण्यात आलेल्या ट्विट अकाउंट होल्डरमध्ये किसान एकता मोर्चा आणि बीकेयु किसान एकता उर्गाहन या संघटनांच्या ट्विटर अकाउंटचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त द कारवान, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीशेखर वेंपारी, कार्यकर्ते हंसराज मीना, अभिनेता सुशांत सिंह, आम आदमी पार्टीचे आमदार जर्नेल सिंग आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते मोहंम्मद सलीम यांची ट्विटर अकाउंटही रोखण्यात आली आहेत.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय गृहमंत्रालय आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या विनंतीवरून माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबतचे आदेश दिले होते.